मुंबई – बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करणारे रॅकेट सीजीएसटी मुंबई सेंट्रल आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले आहे. ते 35 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट विविध कंपन्यांना पुरवत होते.
मुंबई आणि आसपासच्या 15 हून अधिक कंपन्यांना हे बनावट क्रेडिट तयार करून ते पुरवल्याबद्दल अधिकाऱ्यांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती बनावट आयटीसी मिळवत होता आणि प्रत्यक्ष पावती किंवा मालाचा पुरवठा न करता इतरांना पाठवत होता. त्याला सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली आणि मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे अटक प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने गेल्या तीन महिन्यांत छडा लावलेल्या विविध प्रकरणांपैकी एक आहे, बनावट आयटीसी मिळवून ते इतरांना पुरवण्यासाठी खोट्या कंपन्या स्थापन करणाऱ्यांविरुद्ध या विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे.
मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांचे 50 हून अधिक जाळे उघडकीस आणले असून 3000 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. त्यांनी 400 कोटी रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या तीन महिन्यांत 24 जणांना अटक केली आहे.
वास्तविक पावती किंवा मालाचा पुरवठा न करता बनावट आयटीसी तयार करणाऱ्या आणि वापरणाऱ्या बनावट कंपन्या आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे जाळे उध्वस्त करण्याचा आणि प्रामाणिक करदात्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सीजीएसटी विभागाचा प्रयत्न आहे. महसूल वाढवण्यासाठी सीजीएसटी विभाग विविध स्त्रोतांकडून विशिष्ट गुप्त माहिती संकलित करून डेटा मायनिंग आणि डेटा विश्लेषण करून ही विशेष मोहीम राबवत आहे.