मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरतीचा प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात एका मंत्रालयातील कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजार आणि त्यानंतर कायमस्वरूपी नोकरीसाठी 7 लाख रूपये मागितल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेले यशवंत लक्ष्मण कदम (67) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. लक्ष्मण कदम हे गोवंडी येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. कदम यांच्या एम.एस.सी. झालेल्या मुलाला नोकरी मिळण्याकरता ते प्रयत्न करत होते.
लहान मुलगा रत्नजीत कदम यांने व्हॉट्सॲपवर सरकारी नोकरी संदर्भातील जाहिरात बघून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला. माळवे याने त्याला थेट मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजारांची तर कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी साडे सात लाख रुपयांची मागणी केली.
या बोगस लिपिक भरती प्रकरणी माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करत नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देण्यात आले होते. याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. या नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र देण्यात येत नाही. या आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्याशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे’ अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.