सुरत – गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बनावट आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुळ आयपीएल स्पर्धेतील संघांचीच नावे कायम ठेवत युट्युबवरुन या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते, अखेर पोलिसांनी ही स्पर्धा बंद पाडत आयोजक तसेच काही सट्टेबाजांनाही अटक केली आहे.
बनावट क्रिकेट लीग, नकली मैदान व नकली नावांचे क्रिकेटपटू व त्यातील सामन्यांवर तसेच खेळाडूंवरही परदेशातून सट्टा लावला जात होता. गुजरातमधील वडनगर या गावातील शेतात मैदान तयार करत ही स्पर्धा खेळवली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजीसह अन्य काही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका रशियन व्यक्तीचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. त्याने रशियात बसून हा सर्व प्रकार घडवला होता.
गेल्या तब्बल पंधरा दिवसांपासून ही स्पर्धा खेळवली जात होती व त्याचे यूट्यूबवरून थेट प्रक्षेपणही केले जात होते. वडनगर गावातीलच शेतमजूर तसेच काही तरुणांना यात पैसे देऊन सहभागी करुन घेतले गेले होते. या संघांना चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स तसेच गुजरात टायटन्स ही नावे असलेले टी-शर्ट देण्यात आले होते.
सामन्यांसाठी वॉकी-टॉकी, एचडी कॅमेरे तसेच हा सामना अधिकृत वाटावा यासाठी ऍम्बियन्स साऊंडसुद्धा कार्यरत करण्यात आले होते. या सामन्यांचे समालोचन देखील होत होते व हा मेरठमधून आलेला एक व्यक्ती प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्याच आवाजात समालोचनही करत होता. यावर खुद्द हर्षा भोगले यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.