हैदराबाद – हैदराबाद पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला असून 5 जणांना अटक केली आहे. नवोदित गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी शेअर बाजारातील टिप्स देण्याच्या बहाण्याने शेकडो जणांची फसवणूक केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत केलेल्या तपासानुसार या कॉल सेंटरने 140 जणांची 1.08 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे हैदराबाद पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
या संदर्भात हैदराबादेतील सायबर क्राईम पोलिसांकडे 11 जुलै रोजी तक्रार नोंदवली होती. संबंधितांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खात्याऐवजी बॅंक खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले होते.
पैसे गुंतवल्यानंतर संबंधितांनी फोनला प्रतिसाद देणे थांबवले. शेअर मार्केट टिप्स देण्याच्या बहाण्याने आपली 2.6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले होते.