नवी दिल्ली – माणसाच्या हाताचे ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट्स हि त्याची एक युनिक आयडेंटिटी मानली जाते. कोणत्याही दोन माणसांच्या फिंगर प्रिंट्स समान असू शकत नाहीत. पण आता आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये असे गुन्हेगारी कारस्थान उघडकीस आले आहे, ज्यामध्ये एका गुन्हेगारी टोळीने लोकांच्या फिंगरप्रिंट बदलण्याचे कृष्णकृत्य केले आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
फक्त पंचवीस हजार रुपयांमध्ये ही टोळी लोकांच्या हाताचे फिंगरप्रिंट बदलुन देण्याचे काम करत होती. आंध्र प्रदेश मधील आण्णाजीगुडा या जिल्ह्यातील ही घटना आहे साधारणपणे वैद्यकीय शास्त्र असे सांगते की, हात जळाला तरी नंतर फिंगरप्रिंट मात्र आहे तशाच कायम राहतात. पण या टोळीने मात्र विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या हाताचे ठसे बदलून देण्याचे काम केले आहे.
या टोळीने अल्टरेशन सर्जरी नावाच्या एका तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथम राजस्थानमधील एका युवकाच्या हाताचे ठसे बदलले. नंतर या राजस्थानी युवकाच्या माध्यमातून अजून काही लोकांशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या हाताचे ठसे बदलले.
तेलंगणा पोलिसांना याबाबत खबर मिळताच आंध्र प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्यांनी ही कारवाई केली. एका हॉटेलमध्ये ही टोळी आपले काम करत असतानाच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. (Fingerprint Surgery Racket Busted, Telangana Police Arrests Four Accused) चार जणांच्या या टोळीमध्ये एक रेडिओलॉजिस्ट, एक भूलतज्ञ अशा वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. या टोळीने या हॉटेलला आपले क्लिनिक बनवले होते आणि त्यांचे सर्व क्लायंट या हॉटेलमध्येच आपल्या फिंगरप्रिंट बदलून घेण्यासाठी येत होते. या टोळीने आणखी काही लोकांच्या फिंगरप्रिंट बदलल्या आहेत का याबाबत तपास आता सुरू आहे.