बॅंक ऑफ महाराष्ट्रात सापडल्या बनावट नोटा

नगर – बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये बनावट नोटांचा भरणा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पाचशे रुपयांची एक व शंभर रुपयांच्या पाच नोटा आढळून आल्या आहेत. या नोटा एक हजार रुपये मूल्याच्या असल्या, तरी बॅंकेतच बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील कुठल्यातरी शाखेत पाचशे रुपयाची एक व शंभर रुपये दराच्या पाच बनावट नोटांचा कोणीतरी भरणा केला. या नोटा बॅंकेच्या चितळे रोड येथील सिटी ब्रांचमध्ये आल्यानंतर सदर नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत बॅंकेच्या अधिकारी प्रियांका मदनमोहन दुआ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 नोव्हेंबर 2018 पूर्वी सदर नोटांचा भरणा झाल्याचे निदर्शनास आले आहे. बॅंकेतच बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.