भाजप महायुतीला भक्कम जनादेश मिळेल – डॉ. सहस्रबुद्धे

पुणे – आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, जबाबदारीचे भान, परिणामकारक शासनाचा अनुभव, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण, सामाजिक न्याय, सरकार आणि नागरिकांमधील समन्वय यामुळे भाजप महायुतीला भक्कम जनादेश मिळेल असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ, सिद्धार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते.

विकास हाच भाजपच्या प्रचारातील मुख्य मुद्दा आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीच्या आधारावर जनादेश मागत आहोत. गरीब आणि उपेक्षित नागरिकांसाठी “अंत्योदय’च्या माध्यमातून गरीबांच्या योजनांसाठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. कल्याणकारी योजना पोहोचविण्यावर भर दिला. शंभर अतिमागास जिल्ह्यांचा विकास केला. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर, कृषिपूरक व्यवसायांना प्रोत्साहन, कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती ही गेल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केल्याचा दावा डॉ. सहस्रबुद्धे यांनी केला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याबाबत मौन
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित “साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आपण माहिती घेतलेली नाही. मात्र, करकरे यांच्याविषयी आदराची भूमिका आहे,’ असे म्हणत डॉ. सहस्रबुद्धे यांनी आणखी काही बोलणे टाळले. प्रज्ञासिंह यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असेही डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.