यवत – भांडगाव (ता. दौंड) येथील करोना हटाव समितीची आज (दि.22) रोजी बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, गावातील नागरिक तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधता फिरताना आढळून आल्यास त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भांडगाव येथील किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने आठवड्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशीच सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा समितीने निर्णय घेतला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचा इशारा समितीने दिला आहे. दवाखाने, मेडिकल दुकाने, दूध दुकाने ही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यवत चार दिवस बंद
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवा वगळून यवत गावात गुरुवार (दि. 23) पासून रविवार (दि. 26) पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय करोना हटाव आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.