मुंबई – रॉयल चॅलेंजर बेंगळुरु संघाचा विद्यमान कर्णधार फाफ डुप्लेसी व माजी कर्णधार विराट कोहली यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत अनोखे विक्रम साकार केले आहेत. सलामीच्या सामन्यात त्यांना पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही वैयक्तीक कामगिरीत मात्र, या दोन्ही खेळाडूंना यश आले.
या सामन्यात डूप्लेसिने 57 चेंडूंमध्ये 88 धावांची खेली केली. कोहलीने नाबाद 41 धावांची खेळी केली व बेंगळुरुला 205 धावा उभारून दिल्या. तरीही त्यांना दीशाहीन गोलंदाजी व गचाळ क्षेत्ररक्षणामुळे पराभवाचा सामना करावा लागला.
मात्र, या पराभवातही या दोन खेळाडूंनी अनोख्या कामगिरीवर नाव कोरले. बेंगळुरुचे कर्णधारपद यंदा पहिल्यांदाच करणाऱ्या डुप्लेसिसने या स्पर्धेच्या इतिहासात 3 हजार धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा डुप्लेसी सहावा परदेशी खेळाडू ठरला आहे.
याआधी अशी कामगिरी ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन व कॅरन पोलार्ड यांनी केली आहे. दुसरीकडे कोहलीने आयपीएल स्पर्धेत दोनशे डाव खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. यापूर्वी अशी कामगिरी रोहित शर्माच्या नावावर असून त्याने 209 तर सुरेश रैनाने 200 डाव खेळलेले आहेत.