लंडन – टेरर फंडिंग प्रकरणी ब्रिटनमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय व्यक्तीचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. अमेरिकेकडून लागू करण्यात आलेल्या वॉरंटच्या आधारे या व्यक्तीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली होती.
अमेरिकेच्या तपास अधिकाऱ्यांसमोर या व्यक्तीची ओळख परेड झाल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रीया पूर्ण करण्यात आल्याचे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुंदर नागराजन असे या ६५ वर्षाच्या व्यक्तीचे नाव असून त्याचा जन्म मदुराई येथे झाला आहे. वेस्ट लंडन येथील हायेन्स येथून १८ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली.
नागराजन हा हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित अकाऊंटंट असून आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगच्या अनेक प्रकरणांमध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना तो हवा होता, असे ब्रिटनच्या क्राऊन प्रोसिक्युशन सर्वहिसेसने वेस्टमिन्स्टर येथील न्यायालयात सांगितले.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या वॉरंटच्या आधारे अटक केल्यावर प्रत्यार्पणाची सर्व प्रक्रीया पूर्ण केली गेली आणि ८ डिसेंबर रोजी नागराजनला अमेरिकेला पाठवून देण्यात आले, असे सीपीएसने म्हटले आहे.
नागराजन याला नागराजन सुंदर पूंगुलम काशिविस्वनाथन नागा आणि सुंदर पूंगुलम के नागराजन नागराजन असेही म्हटले जाते. तो ब्रिटन आणि बेल्जियममध्येही वास्तव्य करत असायचा. त्याच्या प्रत्यार्पणाला न्यायालयात आव्हान दिले गेले होते. ही सुनावणी पुढील वर्षी सुरू होणार होती. मात्र त्यापूर्वीच प्रत्यार्पण कसे केले गेले, हे समजू शकले नाही.
नझीम अहमद या हिरे व्यापारी, कलाकृतींचा तस्कर आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणातील संशयिताशी सुंदर नागराजन हा संबंधित असल्याचा संशय आहे. अहमद हा हिज्बुल्लाहसाठी निधी संकलन करत असल्याचा संशय आहे. अहमदला अमेरिका आणि ब्रिटनने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.