नवी दिल्ली – जातीभेद आणि वर्णद्वेष निर्मूलनासाठी हजारो समाजसेवकांनी आपले आयुष्य वेचले असले तरी या दोन समस्यांनी जगाला अजूनही ग्रासलेले आहे, असेच अनेकदा दिसून येते. एका ताज्या घटनेत अमेरिकेत भारतातील आघाडीचे उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांची कन्या आणि गायिका अनन्या तिच्या कुटुंबाला वर्णद्वेषी वागणूक देण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा आरोप अनन्याने ट्वीटद्वारे केला असून प्रत्यक्षात वॉशिंग्टन येथील स्कोपा इटालियन रूटस् या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये 24 ऑक्टोबर रोजी बिर्ला कुटुंब भोजनासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले आहे.
आता या घटनेचे वृत्त आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि समाज माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्ठत ठेवले. अनन्या हिने या या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत. विशेष म्हणजे, ट्वीटमध्ये तिने स्कोपा रेस्टॉरंटलाही टॅग केले आहे. तथापि, रेस्टॉरंटने याबाबत ट्विटरवर अजिबात उत्तर न् देता, पूर्णपणे दुर्लक्ष केले आजे. अनन्या ट्वीटमध्ये म्हणते, ‘स्कोपा रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबाला अक्षरश: बाहेर हाकलले. अत्यंत वर्णद्वेषी. खूपच वेदना झाल्या. ग्राहकांशी असंच वागतात का? हे बिलकूल खपवून घेतले जाऊ शकत नाही.’
आता भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या प्रकरणाची सखोल माहिती घेत असून, जाणीवपूर्वक हे कृत्य घडले असल्यास, त्याबाबत अमेरिकी परराष्ट्र खात्याकडे तक्रार दाखल केली जाणार आहे.