शरद पवारांचे राज्यपाल कोश्यारींना ‘खरमरीत’ पत्र; म्हणाले…

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पुस्तक पाठवले आहे. ‘जनराज्यपाल’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकावर अभिप्राय देताना शरद पवार यांनी निधर्मवादावरून राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला आहे.

‘महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररूप कॅफी टेबल बुक प्राप्त झाले. वास्तविक भारतीय संविधानात जनराज्यपाल असा कुठेही नामोल्लेख आढळत नाही. तरी देखील राज्य शासनाकडून अशा शीर्षकाचे सुबक छपाई असलेले, एका वर्षाच्या मर्यादीत कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध काॅफी टेबल बुक मला पाठवण्यात आले याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

पुस्तकाचे अवलोकन केल्यानंतर त्यातील शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत सोहळे, मान्यवरांच्या भेटी, इतर सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम व त्यांचे फोटो पाहण्यात आले, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

पुढे लिहिताना म्हटले आहे, निधर्मवादासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद मात्र या माहीती पुस्तकात दिसून आली नाही, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना पत्रातून लगावला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी पत्रात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राज्यपालांना या शब्दांशिवाय चांगले शब्द वापरू शकले असते असे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.