बीड – बीड जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेत जिल्हा संपर्क प्रमुखांनी सांगितले की, जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना क्षीरसागर यांनी कोणत्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो लावलेला नाही. मुंबईत जाऊन कधी त्यांची भेटही घेतली नाही. नुकत्याच झालेल्या उद्घाटनात उद्धव ठाकरे यांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही. ही खंत वाटल्यामुळे यापुढे त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येतेय, अशी घोषणा पाटील यांनी केली.
दरम्यान, नुकताच बीड नगर परिषदेच्या 70 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन संपन्न झाला. जयदत्त क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे मंजूर झाल्याचे क्षीरसागर यांनी ट्विट केले आहे. मात्र या विकासकामांच्या शुभारंभादरम्यान, क्षीरसागर ज्या पक्षाचे आहेत त्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड नगर परिषदेच्या माध्यमातून ७० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस व मा.ना.अतुलजी सावे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन संपन्न झाला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. pic.twitter.com/DRgdpsydql
— Jaidatta Kshirsagar (@JaidattK) October 21, 2022
क्षीरसागर हे शिंदे गट-आणी भाजपच्या जवळ जात असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आले होते. तसेच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्याआधीच त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.