IND vs PAK – भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये उद्या टी-२० विश्वचषकाचा सामना होणार आहे. सर्वच क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असलेला हा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी १:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पावसाचा व्यत्यय निर्माण नाही झाला तर संपूर्ण षटकांचा सामना खेळला जाईल. मात्र पावसाने खेळ बिघडवला तर चाहत्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळणार नाही. दरम्यान उद्या होणाऱ्या सामन्याअगोदर पाकिस्तान संघाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
#T20WorldCup | पाकिस्तान विरुद्ध कॅप्टन रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब
माघील काही दिवसांमध्ये पाकिस्तानी संघातील खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. सध्याही संघातील अनेक खेळाडूंना दुखापतीच्या समस्या असल्याचे पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने स्वतः म्हटले आहे. संघातील फलन्दाज शान मसूद आणि फखर जमान यांच्या दुखापतीच्या समस्या आहेत. त्याचबरोबर संघाचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी हादेखील मागील काही काळापासून दुखापतीने संघाबाहेर बसलेला होता.
कर्णधार बाबर आझमने म्हटले की, शान मसूद भारताविरुद्धचा ( IND vs PAK ) सामना खेळण्यासाठी फिट झाला आहे. सराव सत्रादरम्यान मसूदला डोक्याला जबर मार लागला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, शान मसुदच्या दुखापतीबाबत रुग्णालयात केलेल्या स्कॅनमध्ये दुखापत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी बोर्डाने मसूदला भारताविरुद्ध खेळण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
त्याचबरोबर बाबर आझमने फखर जमानच्या दुखापतीबाबतही खुलासा केला आहे. फलंदाज फखर जमान अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. आशिया चषकादरम्यान फखर जमानला दुखापत झाली होती. त्यानंतर तो इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आणि न्यूझीलंडमधील तिरंगी मालिका खेळू शकला नाही. त्यामुळे जमानचे भारताविरुद्धच्या ( IND vs PAK ) सामन्यात खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.