प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 -महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागात दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन पर्यायी रस्ता बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाने गती घेतली आहे. यातील एक बोगदा हा सुमारे 9 किलोमीटर लांबीचा असून, यातील सुमारे 7 किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर आहे. या मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून, 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरीडॉर सुधारणा तथा देखभाल, दुरुस्तीसाठी “बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर 30 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने 1999 पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून, या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलो मीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकमुळे मुंबईला लवकर पोहचणे शक्य होणार आहे.
बोर घाटाला पर्याय
बोर घाटातील 6 किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळ्यापासून सुरू होणारा हा बोगदा खोपोली एक्झिट इथे संपणार आहे. 2019 मध्ये या कामास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी कोविडमुळे हे काम थांबले होते. करोनाचे संकट कमी झाल्याने या कामाने गती घेतली आहे. मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे. त्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा असून यातील सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे, असे “एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.