शाहूपुरी पोलिसांची कारवाई; साडेचार लाखांची फसवणूक
सातारा (प्रतिनिधी) – कर्जदारांच्या परस्पर कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा गैरवापर करुन व कर्जादारांची खोटी सही करुन त्याद्वारे त्यांच्या नावावर मोबाईल खरेदीसाठी बजाज फायनान्समधून कर्ज प्रकरण करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी तिघांना अटक केली असून एकजण फरारी आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनयन सुमंत शुक्ल (वय 31, रा. बोरगाव, ता. सातारा, मूळ रा. कौलखेड, जि. अकोला) हा कर्ज प्रकरणे करणारा एजंट आहे. मागील दोन महिन्यांमध्ये त्याने अमीर फिरोज मुल्ला (रा. गोंदवले, ता. माण) यांच्या आईच्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा त्यांच्यापरस्पर गैरवापर करुन व त्यांची बनावट खोटी सही करुन त्याद्वारे त्यांच्या नावावर मोबाईल खरेदीसाठी बजाज फायनान्समधून कर्ज प्रकरण मंजूर करुन घेतले. 36 हजार 990 रुपये किंमतीचा मोबाईल खरेदी करुन त्यांची फसवणूक केल्याबाबतची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व पथकाने गुन्ह्यांचा तपास केला. त्यात मुख्य संशयित सुनयन शुक्ल याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता अजूनही तीन साथीदारांचा यात सहभाग असल्याची माहिती समोर आली. बजाज फायनान्सचे सेल्स एक्झिक्युटीव्ह
प्रफुल्ल प्रकाश बुरुंगे (वय 24, रा. मालखेड, पो. बेलबडे, ता. कऱ्हाड), गौतम मोहन तोरणे (वय 29, रा. प्लॉट नं.11 त्रिमुर्ती कॉलनी, गोडोली) या दोघांनी मदत केली आहे. सुनयन शुक्ल याच्याकडून आतिक अफजल शेन (वय 34, रा. गुरुवार पेठ, एल. बी. एस. कॉलेज समोर) याने मोबाइल विकत घेतला आहे. संबंधितांच्या बॅंक खात्यातून पैसे कमी झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. श्री. शेख, श्री. वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, हिम्मत दबडे-पाटील, नाईक शैलेश फडतरे, अमित माने, कॉन्स्टेबल स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी या टोळीचा पर्दाफाश केला.