जागेचा वाणिज्य वापर करत नसल्याचे पालिकेस सुनावले
पुणे – महापालिकेच्या हद्दीत मेट्रोकडून उभारण्यात येणाऱ्या खांबाच्या जागांचे मूल्यांकन महापालिकेने तब्बल 27 कोटी 68 लाख रुपये केले आहे. तसेच ही रक्कम महापालिकेच्या हिश्श्यातून वजा करावी, असे पत्र पालिकेने महामेट्रोस दिले होते. मात्र, ही रक्कम देण्यास महामेट्रोने नकार दिला आहे.
महामेट्रोने उभारलेले खांब हे शहरातील रस्ता दुभाजकाच्या जागेत उभारले असून, त्याचा कोणताही वाणिज्य वापर केला जात नाही. त्यामुळे महापालिकेची ही मागणी व्यवहार्य नसल्याचे महामेट्रोने पालिकेस पत्राद्वारे कळविले आहे. वनाज ते सिव्हील कोर्ट या मार्गात मेट्रोचे सुमारे 352 खांब आहेत. त्यातील सुमारे 2,292 खांब हे रस्त्यावरून असून उर्वरित 60 खांब हे नदीपात्रातून आहेत. तर, सिव्हील कोर्ट ते रामवाडी या मार्गात 296 खांब असून हॅरिस पूल ते कृषी महाविद्यालयापर्यंत सुमारे 40 खांब आहेत.
रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक खांबासाठी सरासरी 9 चौरस मीटर जागा वापरली असून एकूण 628 खांब पालिका हद्दीत आहेत. त्यानुसार, या खांबांचे एकूण क्षेत्रफळ 5 हजार 652 चौरस मीटर असून त्याचे बाजारभावानुसार मुल्यांकन 27 कोटी 68 लाखांचे केले आहे. हे मूल्यांकन पालिकेच्या हिश्श्यातून वजा करावे, अशी महापालिकेची मागणी होती. मात्र, मेट्रोने ती फेटाळून लावली आहे. महापालिकेने आधी शहरातील वाहतूक सुरक्षिततेसाठी शहरात रस्ते दुभाजक उभारले होते. त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होत नाही. याच जागेवर मेट्रोने प्रकल्पासाठीचे खांबही उभारले आहेत. त्यानंतर दुभाजक पूर्ववत करण्यात येत आहेत. त्यामुळे मेट्रो जागेचा इतर कोणताही वापर करत नसल्याने त्यामुळे सदर जागेची किंमत आकारणी करणे योग्य नसल्याचे मेट्रोने म्हटले आहे.