1938 पासूनचे चलन पाहण्याचा 250 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
मंचर -येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राचीन काळातील नाणी, नोटा, परदेशातील नोटा,पोस्ट तिकिटे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले की कॉईन्स इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
शिवजयंती आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन मोरडेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन पुरी यांनी केले. मंचर गावाचे सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक शकीलभाई जाफरी यांच्या संग्रहातून विद्यार्थ्यांना अभुतपूर्व खजिना पाहायला मिळाला. सुमारे 250 विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
बदललेल्या चलनाबद्दल माहिती देताना शकील जाफरी म्हणाले की, भारतात नोटा म्हणजेच कागदी चलन ब्रिटिश काळात झाले. 1770 ते 1832 या काळात बॅंक ऑफ हिंदुस्थान, जनरल बॅंक ऑफ बेंगाल अँड बिहार, बेंगाल बॅंकने कागदी चलन छापले. 1 एप्रिल 1935 ला रिझर्व बॅंक ऑफ इंडियाची स्थापना झाल्यानंतर 1938 मध्ये 5, 10, 100, 1000 आणि 10 हजार रुपयांची नोट आली.
शकील जाफरी यांच्याकडे सुमारे 100 देशांची नाणी व नोटांचा संग्रह आहे. त्यांच्या संग्रहात केवळ सहा महिन्याची मुदत असलेल्या झिम्बाब्वेच्या कालबाह्य झालेल्या नोटाही आहेत, तसेच भारताच्या सुमारे 20 गव्हर्नरांची सही असलेले 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 500, 1000 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा देखील आहेत.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा देठे, शाळाप्रमुख शशिकला मोहरे,सुमन चासकर, शैला निमसे, माधुरी अनंत आणि मीना मुंढे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद ढोबळे यांनी केले. माधुरी अनंत यांनी आभार मानले.