डॉ. मेघश्री दळवी
या वर्षीचा जून महिना खगोलीय घटनांच्या बाबतीत खूप महत्त्वाचा ठरला. सूर्यग्रहण, अशनींची भेट या नैसर्गिक घटनांपलीकडे काही मानवनिर्मित मोहिमादेखील या काळात यशस्वीपणे पार पडल्या. त्यातली एक म्हणजे आपल्या सोलर प्रोब्जनी सूर्याचा अत्यंत जवळून घेतलेला वेध.
नासाच्या पार्कर प्रोबने ऑगस्ट 2018मध्ये आपलं प्रस्थान ठेवलं होतं. मानवाच्या इतिहासातली सूर्यावरची पहिली स्वारी म्हणजे पार्कर प्रोबची. सौर वारा, सौर वादळं, त्यांचा उगम आणि प्रवास, सौर वाऱ्याचा वेग या सगळ्या अभ्यासासाठी ही मोहीम आखलेली आहे. पार्कर प्रोब जूनमध्ये सूर्याच्या पृष्ठभागापासून पावणेदोन कोटी किलोमीटर अंतरावर पोहोचला, आजपर्यंत सर्वात जवळ. सौर वाऱ्याचं अस्तित्व पहिल्यांदा निश्चित करणाऱ्या यूजिन पार्कर या शास्त्रज्ञांचं नाव या प्रोबला दिलं आहे.
प्रत्यक्ष सूर्याजवळून सौर वाऱ्याचा डेटा हाती आल्यावर ते किती थरारून जातील याची आपण कल्पनाही करू शकत नाही!
पार्कर प्रोबने मिळवलेला डेटा ऑगस्टपर्यंत पृथ्वीवर पोहोचेल आणि नोव्हेंबरमध्ये संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध होईल. त्याचा प्रवास पुढे सुरूच राहणार आहे. सूर्याजवळ चौसष्ट लक्ष किलोमीटरपर्यंत जाऊन प्रभामंडळात तो सुमारे सात वर्षे विहार करणार आहे.
सूर्याभोवती त्याने आतापर्यंत पाच फेऱ्या पूर्ण केल्या आहेत, आणि एकूण चोवीस फेऱ्या पूर्ण करून हा प्रोब आपल्याला माहितीचा प्रचंड खजिना खुला करणार आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीने नासाबरोबर संयुक्तपणे सुरू केलेल्या सोलर ऑर्बिटर मोहिमेलाही जूनमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. दहा फेब्रुवारीला सोलर ऑर्बिटरचं प्रक्षेपण झालं आणि पंधरा जूनला तो पहिल्यांदाच सूर्याजवळ पोहोचला, सूर्याच्या पृष्ठभागापासून केवळ पावणेआठ कोटी किलोमीटर अंतरावर. हे अंतर नुसतं पाहायला प्रचंड वाटलं, तरी अंतराळातल्या एकूण अंतराच्या तुलनेत कमीच म्हणायला हवं आणि त्या अर्थाने हे यान सूर्याच्या जवळ गेलं आहे.
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतराच्या निम्म्या अंतरावर सोलर ऑर्बिटर आज पोहोचलं आहे, ही माणसाच्या कर्तृत्वाची एक खरोखरच महत्त्वाची पायरी आहे. आता सूर्याभोवती फिरत असताना त्यावरच्या उपकरणांची चाचणी सुरू आहे. एकूण सहा अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग दुर्बिणी सोलर ऑर्बिटरवर बसवलेल्या आहेत. त्यांच्याकडून सूर्याची छायाचित्रं जुलैच्या मध्यापर्यंत मिळतील अशी अपेक्षा आहे. पृथ्वीवरून उच्च रेझोल्यूशन दुर्बिणीने सूर्याची छायाचित्रं घेतलेली असली, तरी प्रचंड अंतर आणि वातावरण यामुळे त्यांच्यात त्रुटी राहतात.
मात्र, अंतराळातून आणि जवळून घेतलेली छायाचित्रं अभूतपूर्व असतील यात शंकाच नाही. पार्कर प्रोब सूर्याच्या अधिक जवळ असला तरी त्याच्यावर दुर्बिणी किंवा कॅमेरे नसल्याने सूर्याची पहिली क्लोजअप छायाचित्रं मिळतील, ती सोलर ऑर्बिटरकडूनच. तेव्हा इथे आपण फारसे फिरू शकत नसलो, तरी आपणच घडवलेले हे आपले तांत्रिक दूत मात्र दूर अंतराळात भ्रमण करून तिथले समाचार आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत!