खळबळजनक! नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती

मुंबई : राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती बिकट झाली आहे. अशी अवस्था असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती होत असून कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु आहे.

रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले असून गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात १३० रुग्ण दाखल असून गळतीनंतर काही रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली आहे. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. मात्र यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान, ही घटना छोटी असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोबतच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या घटनेमध्ये ऑक्सिजनही वाया गेला नसल्याची माहिती, टोपे यांनी दिली आहे. स्थानिक प्रशासनाने याबद्दलची माहिती दिल्याचे टोपे यांनी सांगितले.

महापालिकेच्या नोडल अधिकाऱ्याने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, “दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. ऑक्सिजनची मागणी कमी असावी यासाठी काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवलं जात आहे. टाकी अर्धी झाल्यानंतर टँकरमधून पुन्हा ती भरली जाते. यावेळी हा प्रकार घडला”. रुग्णालयात सध्या १३० रुग्ण असून १५ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.