सैनिक संतापला म्हणाला,’मी देशासाठी मरतो, पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाही’

नवी दिल्ली : देशात करोनाचा कहर वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय देशात गेल्या २४ तासात आला आहे. कारण एका दिवसात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे. तर रुग्णसंख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० वर पोहोचली आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये कोविडची चेन ब्रेक करण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून लॉकडाऊन  लावण्यात आले आहे.  ऑक्सिजन बेड आणि मेडिकल यंत्रणेवर करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे  ताण येत असून अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड नसल्यामुळे करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशीच एक घटना मध्य प्रदेशातल्या रिवा येथे घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल  झालेल्या व्हिडीओमध्ये सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. जवान आपल्या पत्नीला घेऊन  फिरला मात्र बेड मिळाला नाही.  यातच त्याने पत्रकरांशी बोलतांना  त्यानं आपली व्यथा मांडली.  यावेळी या जवानाला अश्रू अनावर झाले. त्याने म्हटले आहे की, आजारी पत्नीला घेऊन मी भटकत आहे. तिला कुठे उपचार मिळतील? तिला मी कुठे दाखल करू? मी देशासाठी मरतो. पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीए, असं म्हणत जवानानं संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान,देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.