रुग्णांची तडफड, नातेवाइकांचा आकांत…! खिशात हजारो रुपये असूनही इंजेक्‍शन मिळेना

कोविड सेंटर्समध्येही अजूनही “रेमडेसिविर’चा तुटवडा

– हर्षद कटारिया

पुणे – करोना रुग्णांवर गंभीर परिस्थितीत उपयोगी ठरणारी रेमडेसिविर इंजेक्‍शन अजूनही मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. यामुळे करोना रुग्णांची तडफड आणि रुग्णांना वाचवण्यासाठी नातेवाइकांची परिस्थिती दयनीय झाली आहे.

डॉक्‍टर प्रिस्क्रिप्शन व इतर कागदपत्रे घेऊन नातेवाईक माहिती मिळेल तेथे इंजेक्‍शनसाठी हात पसरत आहेत. खिशात हजारो रुपये असूनही इंजेक्‍शन मात्र मिळत नसल्याची स्थिती आहे. महानगरपालिका आरोग्य विभाग खासगी कोविड सेंटरला मान्यता देत आहे. मात्र, या सेंटर्सला ना ऑक्‍सिजन, ना रेमडेसिविर पुरवठा होतोय. त्यातून रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा क्रूर प्रकार सुरू आहे.

लालफीतशाही कारभार
रेमडेसिविर इंजेक्‍शनचा काळा बाजार रोखण्यासाठी महसूल खात्याअंतर्गत यंत्रणा राबवण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडे रजिस्टर, कोड आणि रेकॉर्ड नसलेल्या कोविड सेंटरला संबंधित अधिकारी कायदा दाखवत इंजेक्‍शन पुरवण्यास परवानगी देत नाहीत, हे वास्तव आहे.

कायद्याची भीती
रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक इंजेक्‍शनच्या गोडाऊनवर विनवण्या करत आहेत. अशा वेळी “कायद्यात नाही त्यामुळे इंजेक्‍शन देऊ शकत नाही’ असे निर्दयी उत्तर मिळत आहे. निलंबनाची कारवाई नको. त्यामुळे मनात असूनही रुग्णांची गंभीर परिस्थिती पाहूनही नियमांमुळे हतबल असल्याची भावना महसूल अधिकारी व्यक्‍त करत आहेत.

आतातरी विचार करावा
सध्या ऑक्‍सिजन आणि इंजेक्‍शनची स्थिती पाहता मागेल त्याला कोविड सेंटरची परवानगी देताना प्रशासनाने विचार करण्याची वेळ आली आहे. अगोदरच मनुष्यबळ व ऑक्‍सिजन नसल्याने पालिकेच्या दवाखान्यांतील बेड रिकामे आहेत.

…तर उद्रेक अटळ
खासगी कोविड सेंटरमुळे पालिका यंत्रणेवर येणारा भार कमी होत असला, तरी आवश्‍यक सेवा न पुरविल्यास येणाऱ्या काळात अनेक खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच नामांकित मोठ्या दवाखान्यात बेड उपलब्ध नसल्याने उद्रेक होईल अशीच परिस्थिती दिसत आहे. कायदेशीर गुंतागुंत निर्माण करून महापालिका व महसूल खाते त्रास देत रेमडेसिविर देत नसल्याची तक्रार आहे.

आयुक्‍तांना मी सांगितले आहे, की नवीन कोविड सेंटरला मान्यता देण्याआधी सुरू असलेल्या सेंटर्सना सुविधा द्या. बिबवेवाडी येथील ईएसआयसी दवाखान्यात ऑक्‍सिजनअभावी निम्मे बेड रिकामे आहेत. अशा परिस्थितीत नवीन सेंटर सुरू करण्याचा अट्टाहास कशासाठी?
– माधुरी मिसाळ, आमदार भाजप


महसूल अधिकाऱ्यांना लोकांच्या जिवाची परवा नसल्याचे चित्र आहे. महसूल खात्यात गरज नसलेला टेबल कमी करून सुटसुटीत कार्यपद्धतीने गरजूंना रेमडेसिविर इंजेक्‍शन मिळणे गरजेचे आहे. मी सुरू केलेल्या दवाखान्यात काही रुग्ण औषधाविना तडफडत असून, अशा वेळी नियम महत्त्वाचे, की नागरिकांचे जीव? कायदेशीर सर्व परवानगी घेऊन सुरू केलेल्या सेंटरमध्ये गंभीर रुग्णांनाही इंजेक्‍शन मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
– वसंत मोरे, नगरसेवक, मनसे


लसीकरणासाठी महानगरपालिका लाखो रुपये खर्च करून मांडव बांधण्यात व्यस्त आहे. सध्या महानगरपालिका दिशाभूल करून काम करत आहे. उधळपट्टीपेक्षा उपलब्ध दवाखान्यात ऑक्‍सिजन, गरजूंना औषधे पुरवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्‍यक आहे. व्हेंटिलेटर व आयसीयूची संख्या तातडीने वाढवली पाहिजे, तरच गंभीर रुग्ण वाचतील. अन्यथा डॉक्‍टरसुद्धा हतबल होतील.
– अभय छाजेड, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी


महानगरपालिकेकडून ऑक्‍सिजन, रेमडेसिविर व करोना रुग्णांना गरज असलेली औषधे तातडीने योग्य संख्येत उपलब्ध करून दिल्यास आम्ही गणपती मंडळे पुढाकार घेऊन कार्यकर्ते मोठे कोविड सेंटर उभारण्यास साथ देण्यास तयार आहोत.
– उदय जगताप, आदर्श मित्र मंडळ.

 


कोविड सेंटरमुळे मोठ्या दवाखज्ञन्यांवर येणारा ताण कमी होत आहे. मात्र, सध्या गंभीर परिस्थिती असलेले रुग्ण आमच्याकडे वाढत असून काही रुग्णांना तातडीने ऑक्‍सिजन व रेमडेसिविरची गरज लागत आहे. मागणी 70 इंजेक्‍शनची असताना 11 इंजेक्‍शन मिळत आहेत, ऑक्‍सिजनचीही कमतरता आहे. अशी परिस्थिती राहिल्यास गंभीर रुग्णांना मोठ्या दवाखान्यांशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे तातडीने औषधे व ऑक्‍सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे.
– डॉ. रणजित निकम, मेट्रो सेंटर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.