मुंबई : दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश करताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. मात्र दीपाली सय्यद यांच्यावर आता यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.त्यांच्या या आरोपाने सध्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे.
भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला,यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. यावेळी शिंदे यांनी पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात मी दीपाली सय्यदचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे अनेक पुरावे प्रशासनाला दिले आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप त्यांनी केला.
तसे त्यांनी,’मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्यांचा तपशील दिला आहे. २०१९ मध्ये दिपाली सय्यद यांना पाकिस्तानचा नकली पासपोर्ट देण्यात आला. त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं आहे. पाकिस्तानात त्यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा मोठा दावा शिंदे यांनी केला.
दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या बायकोशी संबध आहेत. तसेच लंडन, दुबई येथे त्यांची मालमत्ता आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला. “आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू… ज्या बाईचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्या अनेकदा पाकिस्तानात जातात, कराचीत राहतात. त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी आणि त्याच्या बायकोशी संबंध आहेत. आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला भरदिवसा गोळ्या घालतो. आम्ही तुरुंगात जायलाही तयार आहोत,” असेही भाऊसाहेब शिंदे म्हणाले.