संगमनेर (प्रतिनिधी) – बुधवारी (ता. 15) सकाळच्या सत्रात चालू झालेल्या कोरोनाच्या कहराने रात्रीचा अंत मात्र भयंकर केला. 5 जुलै रोजी 23 रुग्ण पॉजिटीव्ह निघाल्यानंतर बुधवारी (दि 15) रोजी मात्र करोना विषाणूने आतापर्यंतचा विक्रम मोडीत काढून तब्बल 51 रुग्णांचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. एकाच दिवशी 51 जण पॉजिटीव्ह आल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 286 झाली असून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे.
बुधवारी (दि 15) सापडलेल्या रुग्णात शहरातील बारा व तालुक्यातील चौदा अशा 26 रुग्णांचा समावेश आहे. यातील दोघांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या दिवसभरात तब्बल 31 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर रात्री उशिरा नव्याने 20 जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याने संगमनेरातील बाधितांची संख्या 286 झाली आहे.
रात्री प्रात झालेल्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मंगळवारी बाधित आढळलेल्या माजी नगरसेवकाच्या कुटुंबातील त्यांची 3५ वर्षीय पत्नी, 13 वर्षीय मुलगी व 5 वर्षीय मुलालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जयभारत चौकातही कोरोनाने शिरकाव करत या भागात राहणाऱ्या 63 वर्षीय व्यक्तीसह त्यांच्या ५० वर्षीय पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.
तसेच शहरातील उच्चभू वस्ती असलेल्या अभिनवनगर परिसरातील 69 वर्षीय व 41 वर्षीय व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच वर्दळीचा परिसर असलेल्या नवीन नगर रोड परिसरात 73 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
आधीच्या बधितांच्या संपर्कात आल्याने मालदाड रोड वरील 37 वर्षीय तरुण, ऑरेज कॉर्नर परिसरातील 5५ वर्षीय पुरुष, जनतानगर परिसरातील 30 वर्षीय तरुणी, त्याचबरोबर तालुक्यातील सुकेवाडी रोड घुलेवाडी येथील 30 वर्षीय महिला, तसेच घुलेवाडीतील मालपाणी नगर परिसरात राहणाऱ्या 38 वर्षीय तरुणालाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मध्यंतरी शांत झालेल्या निमोण परिसरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून येथील 66 वर्षीय, 65 वर्षीय व 71 वर्षीय पुरुषांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. शहरातील लखमीपूरा परिसरातील 32 वर्षीय तरुण, रहेमतनगर परिसरातील ५५ वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील शासकीय प्रयोगशाळेतून आणखी 3 रग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्राप्त अहवालात समोर आले आहे. यात तालुक्यातील जोर्वे येथील एका 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली असून घुलेवाडी येथील आधीच्या कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या एका 3 वर्षीय बालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तर निमोण येथील एका 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे या अहवालद्वारे आढळून आले आहे. बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालात 21च्या रुग्ण संख्येने बुधवारी एका दिवसात कोरोना बाधितांची संख्या 51 अशी झाली आहे तर एकूण रुग्ण संख्या 286 इतकी झाली आहे.