जळगाव – उल्हासनगरमध्ये गणपत गायकवाड यांनी शिंदे महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच सहा गोळ्या झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी रात्री ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हे प्रकरण ताजे असतानाच जळगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी गोळीबार केला होता.
या घटनेनंतर माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पाच अज्ञात तरुणांनी चेहरा मास्क लावून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे.
दरम्यान, राजकीय पदाधिकाऱ्यांवर मागील आठवडाभरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहीसरमध्ये घडलेल्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. या तीन घटनेत अभिषेक घोसाळकर आणि महेंद्र मोरे दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. यावरून आता राज्य सरकारवर टीका केली जात आहे.