दरवर्षीप्रमाणे मर्ढे पूल पाण्याखाली 

ग्रामस्थांच्या मागणीला लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचीही बगल 

सातारा – कृष्णानदीच्या तीरावर वसलेल्या मर्ढे गावाला जोडणारा पुल शुक्रवारी दिवसा आणि रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने दरवर्षीप्रमाणे पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने गावाचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांना गावातच थांबावे लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही मर्ढेकरांच्या या मागणीला सोयीस्कर बगल दिली आहे.

वाई पासून ते साताऱ्यापर्यंत कृष्णी नदीवर अनेक ठिकाणी कमी उंचीचे पुल आहे. त्यातील चिंधवली, खडकी, मर्ढे, गोवे या गावांचे पुल हे नेहमीच पावसाळ्यात पाण्याखाली जातात आणि ही गावे संपर्कहीन होतात. मात्र, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे चिंधवली आणि गोवे याठिकाणी नव्याने मोठ्या उंचीचे पुल बांधून ग्रामस्थांचा कायमचा प्रश्‍न मिटविण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पुलाची उंची वाढविण्याची मागणी करुनही मर्ढे येथील कृष्णा नदीवरील पुलाबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही.

सातारा तालुक्‍यात येणाऱ्या मर्ढे गावाच्या नशिबी कायम हेळसांडच आली आहे. मतदार संघाच्या पुनर्रचनेत सुरुवातीला जावली मतदार संघाला जोडलेल्या 36 गावांमध्ये मर्ढे हे एक गाव आहे. त्यानंतर पुन्हा झालेल्या मतदार संघाच्या पुनर्रचनेत मर्ढे हे गाव कोरेगाव विधानसभा मतदार संघाला जोडण्यात आले. त्यामुळे तालुका जरी सातारा असला तरी मतदार संघ सातारा नसल्याने आ. शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा प्रश्‍नच आला नाही. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांनी मतदार संघ असताना या गावाच्या विकासाकडे नेहमीच पाठ फिरविली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गावात एका विकासकामाच्या उद्‌घाटनासाठी शशिकांत शिंदे आले होते. मात्र मुख्य मुद्या पुलाच्या उंची वाढविण्याचा असताना त्याकडे अद्यापपर्यंत आमदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून ठोस भूमिका घेणे गरजेचे असताना तसे झालेले नाही.

वारंवार मागणी करुनही पुलाच्या उंची वाढविण्यासंदर्भांत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने मर्ढे येथील पुला दरवर्षी पाण्याखाली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावातून बाहेर पडणे मुश्‍किल होत आहे. गावातील मुलां-मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर नोकरदारांनाही पुलावरुन पाणी असल्याने घरीच बसावे लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासना पुलाची उंची वाढवून मर्ढेकरांची होत असलेली हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)