पाहुणा दारात… शेतकरी रानात…!

दिलावर आतार

तारळे – पाटण तालुक्‍यातील तारळे भाग हा निरनिराळ्या जातीच्या भात शेतीचे आगर आहे. या विभागात भात लावणीसाठी अनुकुल पाऊस पडत असल्याने डोंगराळ भागात भात लागणीची कामे हातघाईवर आली आहे. या परिसरातील शेतकरी महिलांसह सकाळी 9 च्या आत घरातील काम उरकून भात लावणीसाठी शेतात दिसत असल्याने एकंदरीतच पाहुणा घरात आणि शेतकरी रानात अशीच अवस्था दिसून येत आहे.

तारळेसह बांधवाट, पाबळवाडी, दुसाळे, करमाळे, वजरोशी, चिंचेवाडी, पांढरवाडी परिसरात भात लागण मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या या परिसरात भात लागणीची कामे 70 टक्के पूर्णत्वाकडे गेली आहेत. या विभागात भात शेती करीत असताना पूर्वी तामसाळ, जिरेसाळ, आंबेमोहोर, काळकुसळी, दोडका या जातीची सुवासिक भात लागण केली जात होती. मात्र बदलत्या काळानुरुप याठिकाणी पूर्वीच्या वाणात घट होत जावून त्याऐवजी बासमती, इंद्रायणी, भोगा वती या जातीचे भात लागणी केली जात आहे.

तसेच कुरीचे भात, टोकणीचे भात, लावणीचे भात असे प्रकार असून कुरीचे भात हे पेरले जाते. टोकणीचे भात शेताच्या घातीवर अवलंबून म्हणजे शेतात घात असेल तर शेतात 12 इंचाच्या काकऱ्या पाडून या काकरीत भात टोकून त्याची तुडवण केल्याने उगवण क्षमता वाढते. या पध्दतीला कमी पाऊस असला तरी चालतो. परंतु लावणीचे भात हे भरपुर पावसावर अवलंबून असते. त्यामुळे याला पाऊस लागतोच लागतो.

त्याचप्रमाणे भात लागण करताना शेतात तयार केलेली रोपे उपटून घेवून शेतात पाणी साठवून पाण्यात नांगरट करून इचर पाटं मारून जमिनीची लेवल करून पाणी कुठे साठतय का बघून बांध घालून पाणी अडवले जाते. त्यास पोटम्या असे म्हणतात. पोटम्यात डफळणी करून चिखल करून भाताची रोपे लावली जातात. डोंगर माथा परीसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जास्तीत-जास्त शेतकरी लावणीचे भात करतात. कारण या भाताला उतारा अधिक असतो. एकंदरीत तारळे विभागात भात लागणीची कामे वेगाने सुरु असून भात लागणीत शेतकरी मग्न असल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे.

समदा उन्हाळा गेला, मात्र एकही उन्हाळी पाऊस नाय.पावसाळ्यात जून महिन्यात पाऊस नाय. पुढं पोटापाण्याचं कसं व्हायचंय, ही काळजी लागली हुती. पण जुलै महिन्यात वरुणराजानं कृपादृष्टी दाखविल्यानं भात लावणीचा प्रश्‍न मिटला. या भात लावणीमुळे सकाळी घरातनं यायचं, अन सांच्याला घरला जायचं. असा दिनक्रम सध्या आमचा सुरु आहे.

मानसिंग सुर्यवंशी, बांधवाट

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.