मंचर -साकोरे (ता. आंबेगाव) येथे मुंबई येथून आलेला 36 वर्षीय नागरिक करोना पॉझिटिव्ह निघाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. संबधित व्यक्तीस पुढील वैद्यकीय उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी-चिंचवड येथे दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
मुंबई येथे संबधित व्यक्तीचा जवळचा नातेवाईक करोनामुळे मृत्यू पावला. त्यानंतर सासू-सासऱ्यांना शिरूर तालुक्यातील एका गावी सोडून ही व्यक्ती त्याच्या मूळ गावी साकोरे येथे शुक्रवारी (दि. 15) रात्री आली. याबरोबरच मुंबईमधून त्याचे भाऊ आणि घरातील इतर 11 सदस्य साकोरे गावी आले. त्यांना गावापासून दूर असणाऱ्या वस्तीवर क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील 36 वर्षीय तरुणाची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यास आणि त्याच्या पत्नीस वैद्यकीय उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले.
तेथे पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला; परंतु या तरुणाचा वैद्यकीय अहवाल या घटनेमुळे तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी साकोरे गावी मंगळवारी (दि. 19) जाऊन ग्रामस्थांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. साकोरेमध्ये बाहेर गावाहून येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
गावातील रस्ते आणि परिसराची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून गावात स्वच्छता केली जाणार आहे. नागरिकांनी घरातच थांबावे आणि बाहेर गावाहून गावात कोणीही येऊ नये, असे आवाहन सरपंच मीरा बीडकर आणि ग्रामपंचायत सदस्या जयश्री मोढवे यांनी केले आहे.