मुंबई – करोनाशी दोन हात करायचे असतील, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं असून यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या घेण्याचा पर्याय आयुष मंत्रालयानं सूचवला होता. यानंतर या गोळ्यांना मोठी मागणी वाढली आहे. मात्र, या वाहत्या गंगेत हात धुवून घेणाऱ्या डोंबिवलीच्या एका होमिओपॅथिक व्यापाऱ्याला मनसैनिकांच्या जागरूकतेमुळे लगाम बसला.
डोंबिवली पश्चिमेच्या सुभाष रोडवर या गोळ्यांची विक्री केली जात होती. मागच्या काही दिवसांत शेकडो लोकांनी या गोळ्या इथून नेल्या होत्या. मात्र, या गोळ्यांची पॅकिंग कशी केली जाते, हे पाहिल्यानंतर लोकांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही.
एका छोट्याशा गाळ्यात तीन मळक्या कपड्यातले बालकामगार कुठल्याही प्रकारची काळजी न घेता या गोळ्या उघड्या हाताने पॅक करत होते. इतकंच नव्हे, तर तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत या गोळ्यांवर आर्सेनिक औषधही टाकलं जात होतं. याचा मनसैनिकांनी जाब विचारल्यानंतर दुकानदाराने फक्त सॉरी म्हणून वेळ निभावून नेली, मात्र या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मंगळवारी सकाळपासून गोळ्या परत करायला गर्दी केली.
या सगळ्यानंतर पोलिसांनी या फार्मसी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तर एफडीएनंही दोन ते तीन तास या फार्मसी चालकाची चौकशी करत कारवाईचे संकेत दिले. त्यामुळे त्याच्या गोरखधंद्याला चाप बसला आहे.