कर्तृत्वापुढे आकाशही ठेंगणे

भारतीय राजकारणातील एक असामान्य प्रतिभा असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.श्रीकांत जिचकार होय. ज्यांनी पाच दशकांच्या जीवनकाळात आपल्या बहुआयामी कार्याने भारतीय जनमानसावर कर्तुत्वाचा ठसा उमटविला. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1954 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला.

भारतातील सर्वाधिक शिकलेले व्यक्तिमत्व म्हणून डॉ.जिचकार यांची ओळख आजही कायम आहे. शिक्षण क्षेत्रासह सर्व क्षेत्रात आपल्या ज्ञानाने त्यांनी ठसा उमटविलेला आहे. डॉक्‍टर, अभियंता, वकील, स्थापत्य, संस्कृत,कला, विज्ञान, तंत्रज्ञान, नियोजन, पत्रकारिता, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, योगा, चित्रकला, शिक्षण, छायाचित्रण, तत्वज्ञान, शास्त्र, आयुर्वेद, लोकप्रशासन, मानसशास्त्र, शरीरविज्ञान, आहारशास्त्र अशा नानाविध शाखांमध्ये त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.डॉ. जिचकार यांनी बेचाळीस विद्यापीठातून शिक्षण घेत अठ्ठावीस सुवर्णपदके मिळविली होती. 1978 मध्ये आयपीएस, 1980 मध्ये आयएएस आणि त्याच वर्षी आयएएसचा राजीनामा देत, वयाच्या पंचविसाव्या वर्षी भारतातातील कमी वयाचे आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर निवड! दहा विषयात एम.ए तसेच एमबीबीएस, एमडी, एमबीए, एलएलएम अशा व्यावसायिक शिक्षणासोबत त्यांनी संस्कृत विषयात डी.लिड मिळविली होती.

एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करीत त्यांनी स्वत:साठी कोणताही विषय वर्ज्य ठेवला नाही. कुशल संघटक, राजकारणी म्हणून काम करताना त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते आणि नेते घडविले. महाविद्यालयीन जीवनापासून कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी त्यांची नाळ जोडली गेली होती. विधानमंडळ, संसद आणि युनिस्को मध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांची चर्चा आजही राजकीय वर्तुळात केली जाते.

मंत्री म्हणून काम करताना खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला. आमदार, खासदार म्हणून काम करताना कायम लोकात राहात त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.जगभर प्रवास करीत, सातत्यपूर्ण अभ्यास करीत त्यांनी आपल्यातील सर्व गुणांना पूर्णपणे न्याय दिला.स्वतःचे वैयक्तिक पन्नास हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचे समृध्द ग्रंथालय त्यांच्याकडे होते. शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करीत विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना न्याय देता यावा, यासाठी समृध्द अशा विद्यापीठाच्या निर्मितीची त्यांची कल्पना होती. ज्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध आराखडा तयार केला होता. आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाच्या सर्वसमावेशक उन्नतीसाठी कसा करता येईल, यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर काम केले.

सार्वजनिक आणि वैयक्तित आयुष्य पारदर्शी ठेवत अल्पावधीतच देशातील आदर्श राजकारणी असा नावलौकिक त्यांनी मिळविला. आपल्याला मिळालेल्या पाच दशकांच्या आयुष्याचा पुरेपूर वापर करीत त्यांनी भारतीय राजकीय पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. राजकीय मूल्य जपत कायम लोकांमध्ये राहात त्यांनी नेता कसा असावा, याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. काळाच्या ओघात राजकारण जरी बदलले असले तरी समकालीन राजकीय परिस्थितीमध्ये डॉ.जिचकार यांची उणीव कायम भासते!

कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर डॉ.जिचकार यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या आधारे मात केली होती. मात्र एका दुर्दैवी अपघातात 2004 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या असे अकस्मात जाण्याने भारतीय राजकारणाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले.अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

– श्रीकांत येरूळे

Leave A Reply

Your email address will not be published.