ध्येयासक्त

अनंत आमुची ध्येयासक्ती आणिक अनंत आमुच्या आशा। किनारा तुला पामराला।। असं कवी कुसमाग्रज सागराला उद्देशून म्हणतात. घरातील कनिष्ठ मध्यमवर्गीय परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील वास्तव्य, शिक्षणासाठी लागणारा अवाढव्य खर्च यांसह असंख्य अडचणींचा सागर समोर असतानाही तिची ध्येयासक्ती आकाशाला गवसणी घालण्याची. अन्‌ आकांक्षापुढती गगनही ठेंगणे ही उक्ती सार्थ ठरवत तिने ती सार्थही ठरवली. एका जिद्दीची ध्येयासक्‍थीची अन्‌ अतुलनीय यशाची ही कहाणी आहे अनुप्रिया लाकडा या सहवैमानिकाची.

ओडिसातील माल्कनगिरी जिल्हा म्हणजे देशातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक. नेहमीच नक्षलवादाचे थैमान असणारा जिल्हा. अशा परिस्थितीत नक्षलींशी कायम दोन हात करणाऱ्या पोलिस कर्मचारी मरिनियस यांची कन्या. नक्षलींच्या हल्ल्याची कायमची भीती. अशा स्थितीत वैमानिक बनून जग पदाक्रांत करण्याचं स्वप्न पाहणं, हेही भन्नाटच. पण केवळ स्वप्न न पाहता अनुप्रियानं ते प्रत्यक्षात उतरवलं.

नक्षलींच्या भीतीच्या सावटाखाली तिनं शालेय शिक्षण माल्कनगिरी येथे पूर्ण केले. मग अभियांत्रिकी शिक्षण घ्यायला ती भुवनेश्‍वरला गेली खरी. पण आकाशात भरारी मारणाऱ्या गरूडाला असलं रूक्ष चाकोरीत सरपटणं कसं मानवणार? तीनं आभियांत्रिकी शिक्षण अर्ध्यावर सोडलं. अनेकांनी तिला समजावलं पण तिचा निर्धार ठाम होता. आपल्या मुलीच्या स्वप्नामागं पदर खोचून उभी राहिली ती तिची आई जिमराज यास्मीन. एकदा ध्येय निश्‍चित झाल्यावर तिनं वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतील प्रवेशाठी जीवाचं रान केलं. एवढेच नव्हे तर त्याकाळात आर्थिक अडचणींसह आलेल्या अनेक संकटांवर मात करत ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. आता ती एका खासगी विमान कंपनीत रुजू होतेय.

आईचा पाठींबा नसता तर माझी कन्या माझाच नव्हे तर जिल्ह्याचा अभिमान बनली नसती, ही तिच्या बाबांची प्रतिक्रिया. वैमानिकांचे शिक्षण घेताना तिला हव्या त्या गोष्टी पुरवणे आम्हाला 2012मध्ये खरोखरंच कठीण होतं त्यासाठी घेतलेल्या कष्टाचं चीझ झालं, ही तिच्या आईची भावना. या दोन्ही तिच्या यशाला सोन्याचे कोंदण देतात.

– दीपाली जंगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)