गांधी समर्थकांचा कार्यालयसमोर जल्लोष, आगरकर समर्थकांची गणपती मंदिरात आरती
नगर – मुख्यमंत्रीपदीची देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी आज सकाळी शपथ घेतल्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्याने नगर शहरात भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र या जल्लोषातही गटबाजीचे दर्शन झाले.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर गुलालाची उधळन करून, लाडू वाटून आंनदोत्सव साजरा केला तर दुसरा माजी शहरजिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांनी नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात आरती केली. त्यावरून नगर भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गांधी समर्थक उपमहापौर मालन ढोणे व महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, सुनिल रामदासी, किशोर बोरा, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.तर दुसरीकडे विशाल गणपतीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस व्हावेत, असे साकडे घालण्यात आले होते; आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
त्यामुळे केलेला नवस पूर्ण झाला म्हणून ऍड. आगरकर समर्थकांनी वशाल गणपतीची आरती करुन तो नवस फेडत आहे. यावेळी प्रा. मधुसूदन मुळे, वसंत लोढा, जगन्नाथ निंबाळकर, मिलिंद गंधे, प्रकाश सैंदर, सचिन पारखी, नितीन उदमले, मुकुल गंधे, अनिल गट्टाणी आदि उपस्थित होते.