जम्मू काश्मिरमधील कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते पार पडले आहे. आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे उभारण्यात आला आहे.
यावेळी मोठ्या उत्साहात झांज व ताशांच्या गजरात नृत्य सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचं भूमीपूजन भारतीय सेनेच्या ‘राष्ट्रीय रायफल्स’च्या 41व्या बटालीयनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते 20 मार्च 2023 रोजी पार पडले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची वैशिष्ट्ये
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशी करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून ते 7 बाय 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार हे पाकिस्तानच्या दिशेकडे दाखवण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 1800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. तसेच याभागातील हवामान, भूस्खलन या गोष्टी लक्षात घेऊन या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नक्कीच पाकिस्तानला धडकी भरवणारा आहे. महाराजांचे हे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.