मुंबई : अल्टिमेट खो-खो मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता, उद्योजक आणि क्रीडाप्रेमी पुनीत बालन यांच्यासह लोकप्रिय गायक बादशाह हे मुंबई फ्रँचायझीचे सह-मालक म्हणून लीगमध्ये सामील झाले आहेत. अल्टिमेट खो-खो च्या एकूण सहा पैकी मुंबई संघ हा सहावा संघ आहे, या वर्षात सदर स्पर्धा पार पडणार असून त्याबद्दलची घोषणा लवकरच लीग मार्फत करण्यात येणार आहे.
लोकप्रिय गायक बादशाह यांनी खो-खो या क्रिडा प्रकारासाठी पुढाकार घेण्यामागे एक भावनिक पैलू आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले, “माझी आई कॉलेजच्या दिवसांमध्ये खो-खो खेळायची आणि हा मातीत रुजलेला, मैदानी खेळ माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. या खेळाबरोबर माझ्या आठवणी तर जोडलेल्या आहेतच पण सोबतच त्याला एक वैयक्तिक पण भावनिक किनार आहे. या भावनिक पैलू मुळे मी अल्टिमेट खो-खो चा भाग बनण्याचा निर्णय घेतला”.
याबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले कि , “खो खो हा एक वेगवान खेळ आहे. यात खेळाडू अत्यंत चपळाईने त्यांचे कौशल्य दाखवतात हे पाहणे अतिशय उत्कंठावर्धक असते. सर्वसाधारणपणे मुंबईची संस्कृती वेगवान आणि कार्यक्षम आहे आणि असाच आमचा हा संघ असावा, अशी आमची इच्छा आहे. या लीग मधून खो खो खेळाडूंसाठी सर्वोत्तम वातावरण, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण तयार करायचे आहे”.
यशस्वी तसेच प्रभावी तरुण आणि गतिशील उद्योजक, पुनीत बालन हे आधुनिक-युगातील क्रीडा गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. ३,५०० कोटी रुपये उलाढाल असलेल्या बालन गृपचे प्रमुख पद भूषवण्याव्यतिरिक्त ते बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस आणि हँडबॉल लीग सारख्या विविध क्रीडा लीगमधील संघांचे मालक आहेत. या शिवाय स्पोर्ट्स एम्प्लॉयमेंट स्टार्ट-अप मध्ये त्यांनी प्रचंड गुंतवणूक केली आहे आणि विविध खेळाडूंना सक्रियपणे पाठिंबा दर्शविला आहे.
अल्टिमेट खो-खो खेळातील विविध पातळीवरील या विकासासोबतच, खो-खो या स्वदेशी खेळात क्रांती घडवून आणण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने मोठी पावलं उचलत आहे. या लीगने यापूर्वी आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील, अदानी गृप, जीएमआर ग्रुप, कॅप्री ग्लोबल आणि केएलओ स्पोर्ट्स या आणि अशा अनेक कॉर्पोरेट कंपन्याच्या व ओडिसा सरकारच्या सहकार्याने खो खो लीग स्पर्धा अधिक उंचीवर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात यश संपादन केले आहे.