पदवीधर मतदार नोंदणीचा फज्जा : मतदारांनी फिरवली पाठ की नियम आले आड?
अमरसिंह भातलवंडे
पिंपरी- पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नाव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा पुरता फज्जा उडालेला दिसत आहे. शहरी व ग्रामीण दोन्ही भागातून अत्यल्प मतदार नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणीकडे पदवीधरांनीच पाठ फिरवली की नोंदणीचे नियम आणि प्रक्रियाच अडसर ठरली आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघातून केवळ 4 हजार 453 मतदारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर हवेली उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व तहसील कार्यालयामधून केवळ 23 हजार 959 पदवीधर मतदारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 2 हजार 544 अर्ज बाद झाले असून केवळ 22 हजार 415 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार पुणे पदवीधर नोंदणीला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली होती. ही प्रक्रिया 7 नोव्हेंबर पर्यंत चालली. पदवीधर मतदारांची संख्या वाढावी यासाठी स्थानिक निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीही करण्यात आली. असे असतानाही पुणे पदवीधर मतदारसंघात अपेक्षित मतदारसंख्या वाढली नसल्याचे दिसून येत आहे. गत निवडणुकीच्या वेळी नोंदणी केलेल्या मतदारांनाही नव्याने नोंदणी करावयाची असल्याने हा एकूण पदवीधर मतदारांचा आकडा खूपच खाली घसरला आहे.
गत निवडणुकीत नोंदणी केलेल्या मतदारांना या निवडणुकीत नव्याने नोंदणी न केल्यास ग्राह्य धरले जाणार नसल्याने हा गोंधळ निर्माण झाला असल्याचेही काही नागरिकांचे मत आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातूनही अपेक्षित मतदार नोंदणी झालेली दिसून येत नाही. पिंपरी-चिंचवड सारख्या शैक्षणिक दृष्ट्या नावाजलेल्या शहरातही पदवीधर मतदारांची नोंदणी अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे.
भोसरी सर्वांत मागे
पिंपरी-चिंचवड शहरासारख्या महत्वपूर्ण शहरातूनही केवळ 4 हजार 453 पदवीधरांची नाव नोंदणी झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वात कमी नोंदणी ही भोसरी तहसील कार्यालयात झाली आहे. भोसरी तहसील कार्यालयात केवळ 920 पदवीधर उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 935 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. पिंपरीत 1 हजार 598 पदवीधरांनी नोंदणी केली आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून इतर दोन मतदार संघांच्या तुलनेत चांगली नोंदणी झाली आहे, असे म्हणावे लागेल. तरीही विधानसभेसाठी लाखो मतदार असणाऱ्या या मतदार संघामध्ये दोन हजारही पदवीधरांची नोंदणी होत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही नोंदणी अत्यल्प असून यावर्षी नव्याने होत असलेल्या पदवीधर नोंदणीकडे मतदारांनी पिंपरी-चिंचवड शहरातून तरी पाठच फिरवली आहे.
हवेली कार्यालयाकडे 23 हजार 959 अर्ज
हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे 23 हजार 959 अर्ज आले होते. त्यापैकी 2 हजार 544 अर्ज बाद झाले असून 22 हजार 415 अर्ज स्विकारण्यात आले आहे. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
दुबार नाव नोंदणीला विरोध
निवडणूक आयोगाने 2014 ला पदवीधर मतदारसंघात नोंदलेल्या पदवीधरांची नावे पुन्हा नोंदवावीत असे आदेश दिले होते. मात्र नाव एकदा नोंदविले तर ते कायम राहिले पाहिजे अशी मागणी अनेकांनी केली होती व दुबार नावे नोंदवण्यास विरोध केला होता. जर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जुनी नावे कायम ठेवून फक्तनवीन वयोमानाने वय पात्र झाल्यास व स्थलांतरित मतदानाचा हक्क देण्यासाठी याद्या तयार होतात. त्याच प्रमाणे पदवीधरांची नाव नोदणीही कामय ठेवावी व पदवीधरांच्या बाबतीत होत असलेला भेदभाव बंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन फेडरेशनने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन फेडरेशनच्या वतीने उच्च न्यायालयात विशेष जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही फेडरेशनचे अध्यक्ष ऍड. अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.