साउदम्पटन – जो रूट याने केलेले नाबाद शतक हेच इंग्लंडच्या एकतर्फी विजयाचे वैशिष्ट्य ठरले. त्यांनी वेस्ट इंडिजवर आठ गडी व 101 चेंडू राखून विजय मिळविला.
वेस्ट इंडिजला इंग्लंडने 44.4 षटकात 212 धावांमध्ये रोखले. इंग्लंड्ने 33.1 षटकांमध्ये केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. रूट याने 11 चौकांरासह नाबाद 100 धावा टोलविल्या. त्याने जॉनी बेअरस्टो याच्या साथीत सलामीसाठी 95 धावांचा पाया रचला. बेअरस्टो याने 45 धावा करताना सात चौकार मारले. त्याच्या जागी आलेल्या ख्रिस वोक्स यानेही रूट याला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटकरिता 104 धावांची भर घातली. वोक्स 40 धावा काढून बाद झाला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. ख्रिस गेल या धोकादायक फलदाजासह विंडीजचे पहिले तीन गडी 55 धावांमध्ये बाद झाले. गेल याने पाच चौकार व एक षटकारासह 36 धावा केल्या. पूरन व शिमोरन हेटमेयर यांनी चौथ्या विकेटसाठी 89 धावांची भर घातली. हेटमेयर याने चार चौकारांसह 39 धावा केल्या. नंतर विंडीजकडून मोठी भागीदारी झाली नाही.
पूरन याने 63 धावा केल्या. त्याला जोफ्रा आर्चर याने बाद केले. आंद्रे रसेल याने दोन उत्तुंग षटकार ठोकले मात्र, तो 21 धावा काढून तंबूत परतला. झंझावती फटकेबाजीबाबत ख्यातनाम असलेल्या कार्लोस ब्रेथवेट यानेही निराशाच केली. केवळ चौदा धावा काढून त्याने तंबूचा रस्ता पकडला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज – 44.4 षटकात सर्वबाद 212 (ख्रिस गेल 36, निकोलस पूरन 63, शिमोरन हेटमेयर 39, आंद्रे रसेल 21, मार्क वुड 3-18, जोफ्रा आर्चर 3-30, जो रूट 2-27).
इंग्लंड – 33.1 षटकात 2 बाद 213 (जो रूट नाबाद 100, जॉनी बेअरस्टो 45, ख्रिस वोक्स 40, शॅनन गॅब्रिअल 2-49)