लंडन – इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्डस मैदानावर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाचा कर्णधर ज्यो रुट याने केलेल्या शतकामुळे इंग्लंड भक्कम स्थितीत आला आहे.
या सामन्यात शनिवारी टी ब्रेकपर्यंत इंग्लंडने 5 बाद 314 धावा करत 50 धावांची आघाडी घेतली.तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 3 बाद 119 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. इंग्लंडकडून ज्यो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिले सत्र पूर्ण खेळून काढत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच दुसऱ्याच षटकात जो रुटने अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी पुढेही चांगली भागीदारी करणे सुरु ठेवत भारताच्या गोलंदाजांना 73 षटकांपर्यंतही एकही यश मिळू दिले नाही.
दुसऱ्या सत्राचीही सुरुवात त्यांनी चांगली केली.
पण महंमद सिराजने डावाच्या 79व्या षटकात बेअरस्टोला विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. बेअरस्टो 107 चेंडूत 7 चौकारांसह 57 धावा करुन माघारी परतला.
तो बाद झाल्यानंतर रुटला साथ देण्यासाठी जोस बटलर फलंदाजीस आला. दरम्यान, 82व्या षटकात रुटने त्याचे 22वे कसोटी शतक पूर्ण केले. या कामगिरीसह रुटने कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पाही पार केला आहे.
राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क
तिसऱ्या तिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना भारताचा केएल राहुल थर्ड मॅन बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी डावाचे 69व्या षटक सुरु असताना प्रेक्षकांमधून काही जणांनी शॅम्पेन कॉर्क (बॉटलची झाकणे) केएल राहुलच्या दिशेने फेकून मारली.
याबद्दल केएल राहुलने भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे तक्रार केली. कॉर्कमुळे जरी काही नुकसान झाले नसले, तरी प्रेक्षकांवर सध्या टिका होत आहे. असे असले तरी अद्याप विराटने याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही. दरम्यान, भारताचे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांनी हॉटेलमध्ये 10 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण केले आहे. यामुळे दोघेही लॉर्डस येथे संघात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 126.1 षटकांत सर्वबाद 364 धावा. इंग्लंड पहिला डाव – 3 बाद 119 धावांवरून पुढे. (रोरी बर्न्स 49, ज्यो रूट खेळत आहे 132, जॉनी बेअरस्टो 57, मोईन अली खेळत आहे 20, महंमद सिराज 3-71).