वेलिंग्टन – सोफिया डंक्लेची फलंदाजी व सोफी एक्केलस्टोन व शर्लेट डीन यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा 100 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.
इंग्लंडने बांगलादेशचा मोठ्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी इंग्लंडला बांगलादेशला पराभूत करणे आवश्यक होते.
यंदाच्या स्पर्धेतील पहिले तीनही साखळी सामने गमावल्यानंतरही इंग्लंडने थाटात पुनरागमन केले व सलग चार सामने जिंकताना उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. एकवेळ 4 बाद 96 अशी स्थिती बनली होती. मात्र, सोफिया डंक्लेने अप्रतिम अर्धशतकी खेळी करत संघाला द्विशतकी धावांची मजल मारून दिली. तिने 72 चेंडूत 67 धावांची खेळी केली. इंग्लंडचा डाव 50 षटकांत 6 बाद 234 धावांवर रोखला गेला. विजयासाठी 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक्केलस्टोन व डीन यांच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव 48 व्या षटकांत 134 धावांवर संपला.
बांगलादेशकडून लता मोंदलने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. मात्र, अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. इंग्लंडकडून एक्केलस्टोनने 15 धावांत 3 तर, डीनने 31 धावांत 3 गडी बाद केले. फ्रेया डेव्हिसने 36 धावांत 2 बळी घेतले.