गोंदिया – मनात जिद्द आणि चिकाटी असली की काहीही शक्य होते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे गोंदिया शहरातील चहा विक्रेते सुरेश पटले यांची मुलगी प्रीती पटले. प्रीतीने बिकट परिस्थीतीवर मात करत सातत्याने अभ्यास करून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
2019 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत ती पास झाली आहे. 25 मार्चला या परीक्षेचा अंतिम निकाल लागला त्यात प्रीतीने मुलींच्या ओबीसी प्रवर्गातून राज्यात 17 वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत ती गोंदिया जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेली एकमेव तरुणी ठरली आहे. संपूर्ण जिल्ह्यातून तिचे कौतुक केले जात आहे.
गोंदिया शहराच्या कुडवा परिसरात राहणारे सुरेश पटले यांचे चहाचे दुकान आहे. सुरेश यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मनिर्भर केले आले. प्रितीने देखील आज वडिलांच्या सहकार्याने उच्च शिक्षण घेऊन पी एस आय (PSI) पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. 2017 साली प्रिती स्पर्धा परीक्षेकडे वळली असून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल 25 मार्चला आला असून प्रितीने मुलींच्या ओबीसी प्रवर्गात राज्यात 17 वा क्रमांक मिळविला आहे.
मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकता, असे प्रीतीचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे वडिलांच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. अशा अडचणीच्या काळातही प्रीतीला कुटुंबाची साथ लाभली. मिळालेल यश हे संयमाच्या जोरावर प्राप्त केले आहे. इतक्या अडचणींच्या काळात कुटुंबीय सोबत होते तसेच मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असे प्रीतीने म्हंटले आहे.