लंडन – ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या लसीला इंग्लंडने वापरासाठी परवानगी दिली आहे. असे करणारा हा पहिलाच देश आहे. करोनाच्या नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी आणि ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ही लस महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. ही लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारा उत्पादित केली जात आहे.
या लसीच्या दोन डोस वापरायला प्रशासनाने मान्यता दिली असून त्याचा आपत्कालीन वापरासाठी पुरवठा करण्यासही मान्यता दिली आहे. इंग्लंडने या लसीच्या 10 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे, असे ऍस्ट्राझेन्काने म्हटले आहे.
करोनावरील ऑक्सफर्ड विद्यापीठ/ऍस्ट्राझेन्का यांनी बनवलेल्या लसीला मान्यता देण्याची औषधे आणि आरोग्य उत्पादने नियामक यंत्रणेने केलेली शिफारस आज सरकारने स्वीकारली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर आम्ही अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करू, असे ट्विट पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी केले आहे.
या साथीने आतापर्यंत जगात 17 लाखाहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. गेल्यावर्षी चीनमधील वुहानमध्ये या साथीचा उद्रेक झाल्यानंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. विशेषत: ब्रिटन आणि द. अफ्रिकेत करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे या देशातील विमानसेवा अणि व्यापारावर जगभरातील अनेक देशांनी निर्बंध घातले आहेत.
ऍस्ट्राझेन्का आणि अन्य लस उत्पादकांनी या नव्या विषाणूवर आम्ही संशोधन करत आहोत. मात्र, आम्ही निर्माण केलेली लस त्यावर प्रभावी ठरेल असा अंदाज वर्तवला आहे. पूर्ण दोन डोस दिलेल्यांमध्ये ही लस 62 टक्के परिणामकारक ठरली तर आधी अर्धा डोस देऊन नंतर पूर्ण डोस दिलेल्यांमध्ये ही लस 90 टक्के परिणामकारक ठरली. अर्धा डोस आणि पूर्ण डोसच्या परिणामकारकतेबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
नवीन लस मिळणार असल्याने इंग्लंडमधील लक्षावधी नागरिकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. ती परिणामकारक तर आहेच या शिवाय त्याचे व्यवस्थापन सहज शक्य आहे.
– पास्कल सोरिओट
ऍस्ट्राझेन्काचे मुख्य कार्यकारी अधिकारी