नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या कथित उत्पादन शुल्क धोरणातील गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे छापासत्र सुरूच आहे. त्यांनी आज या अनुषंगाने अनेक ठिकाणी छापे टाकले. या संबंधात प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, त्यांनी कितीही छापे टाकले तरी त्यांना काहीही सापडणार नाही. कारण आम्ही काहींही गैर केलेले नाही.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्यात सिसोदिया (Delhi Deputy Chief Miister Manish Sisodiya) आणि काही नोकरशहांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली होती, जी आता मागे घेण्यात आली आहेत. जर ईडीचे (Enforcement Directorate)अधिकारी माझ्या घरी आले तर त्यांना फक्त काही शाळांचे नकाशे सापडतील, असे दिल्लीचे सिसोदिया यांनी सांगितले.
माझ्याकडे लपविण्यासाठी काहीही नाही. मी माझे काम प्रामाणिकपणे केले आहे. असे सिसोदिया यांनी एका कार्यक्रमाच्यावेळी पत्रकारांना सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली, तेलंगणा, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील सुमारे 30 परिसरांची या प्रकरणात झडती घेतली जात आहे आणि यातील संशयितांवर छापे टाकले जात आहेत. सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी सिसोदिया, दिल्लीचे माजी उत्पादन शुल्क आयुक्त आरवा गोपी कृष्णा यांच्या निवासस्थानांसह आणि सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्य 19 ठिकाणी छापे टाकले होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारमध्ये उत्पादन शुल्क आणि शिक्षणासह अनेक खात्यांचा कार्यभार आहे.