डॉ. एम. के. इनामदार : इंदापुरात “भाई आणि आम्ही’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
रेडा (प्रतिनिधी) – जीवनात सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपले आदर्श कुटुंब निर्माण करणारे गोकुळदास शहा (भाई) यांचे आदर्श व्यक्तिमत्व हे तरूण पिढीला ऊर्जा देते, असे गौरवोद्गार प्रसिद्ध डॉ. एम. के. इनामदार यांनी काढले.
इंदापूर शहरातील शहा परिवाराच्या वतीने “भाई आणि आम्ही’ या मुकुंद शहा यांनी शब्दांकन केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन इनामदार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जीवन साधना गौरव पुरस्कारप्राप्त गोकुळदास शहा (भाई), नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन भरत शहा, डॉ. विद्युत शहा, डॉ. संजय शहा, शकुंतला शहा, मालती शहा, वैशाली शहा, शैलेश शहा, सौरभ शहा, भरत गांधी, यश गांधी, जिगर दोशी, रिया दोशी, निनाद शहा, अंगद शहा, पूर्वा शहा उपस्थित होते.
इनामदार म्हणाले की, भाई यांना भेटल्यानंतर जीवनाला आकार देणारी ऊर्जा प्राप्त होते. खऱ्या अर्थाने चांगल्या विचारापासून फारकत न घेता अविरत कष्ट करण्याची तयारी ठेवली आहे. वयाच्या 84 व्या वर्षी समाजकार्य, व्यवसाय, आदर्श कुटुंब ठेवण्याची किमया भाई यांनी केली आहे. या पुस्तकातून नव्या पिढीला आदर्श जीवनशैली जगण्याची भूमिका पार पाडता येणार आहे.
मुकुंद शहा म्हणाले की, माझे वडील भाई यांची साधी राहणी असली तरीदेखील गांधीवादाने प्रेरित झालेले भाई यांचे व्यक्तिमत्व पुस्तकरुपात व्हावे अशी इच्छा होती. त्यांच्या जीवनातील चढ-उतार यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 1936 पासून भाई यांच्याकडून राजकारण, समाजकारण अर्थकारण जाणून घेतले. त्यामुळे ध्येयवादाने काम करणाऱ्यांना हे पुस्तक आदर्शवत ठरणार आहे. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने गोकुळदास शहा भाई यांचा सन्मान तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, सागर शिंदे, महेश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. भरत शहा यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आभार मानले.