भुलेश्वर (वार्ताहर) – भुलेश्वर महादेवाची श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त प्रातिनिधिक यात्रा शांततेत पार पडली. यावेळी भुलेश्वरास नीलकंठेश्वराचे विलोभनीय रुप साकारले होते.
पहाटे तीन वाजता पुजारी मंडळाच्या वतीने शिवलिंगाला रुद्राभिषेक करून सकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली पुराणातील आख्यायिकेप्रमाणे श्री भुलेश्वर महादेव या डोंगरावर तपसाधना करीत होते. आज भुलेश्वर महादेवाचे तेच रूप पाहायला मिळाले. पुजारी मंडळींनी सजावटीसाठी खास विविध प्रकारची झाडांची रोपे मागून घेतली होती.
गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या भोवती विविध प्रकारची झाडांची आरास करण्यात आली होती. यावेळी साक्षात महादेव या भुलेश्वराच्या डोंगरावर जंगलांमध्ये साधना करीत असल्याचा भास होत होता. देवस्थानच्या पुजाऱ्यांनी सांगितले की, या पूजेनंतर ही झाडे या डोंगरावरच लावली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.