हडपसर – पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई बाहेरील परिसरात विनापरवाना धारक भाजी विक्रेते अतिक्रमण करतात. भाजी मंडईचे प्रवेशद्वार आणि मंडई परिसरात अधिकृत भाजी विक्रेते दुकान मांडत आहेत. भाजी मंडई बाहेरील परिसरात अतिक्रमण वाढले आहे. अधिकृत भाजी विक्रेत्यांच्या भाजी विक्रीवर याचा परिणाम होत आहे. क्षेत्रीय कार्यालयासह महापालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
हडपसर गाव येथे असलेल्या भाजी मंडईत परवाना धारक 930 भाजी विक्रेते बसणे अपेक्षित आहे. मात्र, यापेक्षा अधिक भाजी विक्रेते येथे असतात. तसेच, भाजी मंडईत येणाऱ्या चारही बाजूंच्या प्रवेशद्वार तसेच भाजी मंडईत जाणारे अंतर्गत रस्ते याठिकाणीही अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे अधिकृत परवाना धारक भाजी विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांना महापालिका अधिकारी पाठीशी घालत असल्याचे परवानाधारक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
भाजी मंडई मध्ये 930 भाजी विक्रेत्यांना एकसमान गाळे आखून देण्याची तसेच मंडई बाहेरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. याशिवाय एकच परवाना असताना चार-चार जागेवर भाजी विक्रीची दुकाने मांडूनही अतिक्रमण होत आहे, अशी अतिक्रमण काढून मंडई परिसर मोकळा करावा, अशी मागणी परवानाधारक विक्रेत्यांकडून होत आहे.