वडगाव मावळ – सद्यस्थितीत ग्रामपंचायत कर वसुली करणे म्हणजे मोठी अवघड बाब झाली असून ग्रामपंचायत अंतर्गत कर वसुली करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वसुली करण्यासाठी गेल्यावर नागरिक सुविधांची मागणी करतात व करोनाचे कारण देत कर भरण्यास टाळाटाळ करत असतात. अशा परिस्थितीत मुंढावरे वडिवळे आणि वळक या ग्रुप ग्रामपंचायतीने स्वत:चे कार्यालय नसतानादेखील शाळेच्या खोल्याममध्ये बसून 100 टक्के कर वसुली करून दाखविली. ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ हीलम व ग्रामसेवक मेघा ठाकर यांनी महिला जनजागृतीच्या माध्यमातून ह उद्दीष्ट साध्य केले.
मावळ तालुक्यात एकूण 103 ग्रामपंचायती असून, त्यामधील मालमत्ता कराची एकूण मागणी 40 कोटी 53 लाख रूपये आहे. आतापर्यंत त्यापैकी 33 कोटी 23 लाख रूपये कर या वर्षी वसुल झाला असून 7 कोटी 30 लाख रूपये येणे बाकी आहे. गेल्या दोन वर्षात करोनाच्या महामारीमुळे गावो-गावचे अर्थ चक्र बिघडले होते. त्यामुळे ग्रामपंचायतींना मिळणारी कराची रक्कम देखील मिळाली नव्हती. पर्यायाने अनेक ठिकाणी विकास कामेदेखील रखडली आहेत. परंतु आता मावळ करोनामुक्त झाला असून गावो -गावचे अर्थकारण पुन्हा सुरळीत झाल्याने या वर्षी 33 कोटी 23 लाख रूपये कराची रक्कम वसुल झाली आहे.
तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीने घरपट्टी, आरोग्यकर, दिवाबत्ती, पाणी पट्टी व अन्य कराची वसुली व्हावी यासाठी पंचायत समिती, ग्रामसेवक व गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची बैठक घेऊन कर वसुली मोहीम राबवली तर काही प्रकरणे न्यायालयात लोक अदालतमध्ये तडजोड करून मिटविली. त्यामुळे वसुलीही चांगली झाली आहे.
तालुक्यात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीत कान्हे, खडकाळे, नवलाख उंब्रे, सोमाटणे, वराळे, उर्से व अन्य काही ग्रामपंचायती आहेत. या वर्षी सोमाटणे, कान्हे उर्से, टाकवे , खडकाळा , वराळे टाकवे बुद्रुक , नवलाख उंब्रे, शिरगाव साळुंखे, गहुंजे, साते, मळवली व इतर काही ग्रामपंचायतींची 80 टक्के कर वसुली झाली आहे.
दोन ग्रामपंचायतीची 100 टक्के वसुली
मावळ तालुक्यात 103 ग्रामपंचायती असून उदेवाडी व मुंढावरे या दोन ग्रामपंचायतीची 100 टक्के वसुली झाली आहे. विशेष म्हणजे आदिवासी पट्ट्यातील उदेवाडी ग्रामपंचायत गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी मार्च महिन्याच्या 1 तारखेला 100 टक्के वसुल करून पंचायत समितीत भरणा करणारी एकमेव ग्रामपंचायत आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षात कर वसुलीचे प्रमाण घटले होते.या वर्षी जास्तीत जास्त वसुली व्हावी यासाठी
गावोगावी वसुली कॅम्प घेण्यात आले. काही प्रकरणांमध्ये न्यायालयात तडजोड केली. त्यामुळे 33 कोटी 23 लाख वसुल झाले आहेत. 7 कोटी बाकी असून या रकमेची देखील वसुली होईल.
– एम. डी. कारंडे, विस्तार अधिकारी
ग्रामपंचायत अंतर्गत मालमत्ता कराची 100 तक्के वसुली करण्यासाठी गावामध्ये महिला जनजागृती सभा आयोजित करून महिलांमध्ये जागृती करून तसेच लकी ड्रॉ ठेऊन व घरोघरी जाऊन 100 टक्के कर वसुली केली आहे.
– मेघा ठाकर, ग्रामसेवक,मुंढावरे ग्रामपंचायत