पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत विचार मंथन
पिंपरी – संघटना ही पक्षाचा कणा आहे. तो मजबूत करण्यासाठी संघटनात्मक कामांवर भर द्या. कार्यकर्ता घडला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत कुठे मताधिक्य घटले ते पाहून यापुढील काळात झालेल्या चुका दुरूस्त करा, असे आवाहन राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी केले.
पिंपरी-मोरवाडी येथील खासगी महाविद्यालयात ही बैठक झाली. बैठकीला माजी सहकारमंत्री सुभाषराव देशमुख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माधवी नाईक, निवडणूक सहाय्यक अधिकारी तथा आमदार अनिल सोले, आमदार तथा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी तसेच राजेश पिल्ले आदी उपस्थित होते.
निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच शहरामध्ये राज्य पातळीवरील नेत्यांनी बैठक घेतल्याने शहरातील दोन्ही आमदार व बहुतेक सर्व पदाधिकारी या बैठकीला आवर्जुन उपस्थित होते.
भाजपच्या प्रभाग अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा विविध निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. भाजपमध्ये सध्या संघटनात्मक निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्या दृष्टीने व्यूहरचना सुरू आहे. भाजपचे 3 हजार सक्रिय सदस्य करायचे, असे नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक सक्रिय सदस्याने किमान 25 सदस्य बनवायचे. त्यासाठी सध्या सदस्य नोंदणी मोहीम वेगात सुरू आहे. भाजपचे शहरात 6 मंडल अध्यक्ष, 32 प्रभाग अध्यक्ष आणि 1220 बूथ अध्यक्ष नेमले जाणार आहेत. ही प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. संबंधित कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास 10 डिसेंबरपर्यंत भाजपसाठी नवीन शहराध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया होईल. तर, 15 डिसेंबरला प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. या सर्व प्रक्रियेबाबत दीड तास चाललेल्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीमध्ये संघटनात्मक निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा, वार्ड स्तरावर कशा प्रकारे निवड प्रक्रिया, सदस्य नोंदणी केली जाणार आहे, याबाबत शहरातील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.