कवठे – वेळे ग्रामपंचायत मालकीच्या जागेतून तिऱ्हाईताने स्वतःच्या पोकलेन मशिन व डंपरचा वापर करून ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून मुरूमाचे उत्खनन करुन त्याची विक्री केल्याचा प्रकार ग्रामस्थांमुळे उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकाराचे गाव कारभाऱ्यांना कसलही माहिती नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मालकीच्या पोकलेन व डंपरच्या साहाय्याने हा मुरूम काढला जात होता. ग्रामपंचायतीची ही मिळकत सध्या गायरान म्हणून अस्तित्वात आहे. वेळे ते भिलारेवाडी या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित रोड कंत्राटदाराला या जागेतून मुरूम नेण्याची परवानगी दिली.
याच्या बदल्यात ग्रामपंचायत हद्दीतील इतर कच्चे रस्ते दुरुस्त करण्यासाठी येथील मुरूम वापरण्यास याच रोड कंत्राटदाराला सांगण्यात आले होते. वेळे ते भिलारवाडी या रस्त्याचे मुरुमीकरण सध्या पूर्णपणे बंद आहे. तर शेवटच्या टप्प्यात या रस्त्यासाठी मुरुमाची आवश्यकता भासेल असे कंत्राटदाराने सांगितले.
वेळे ग्रामपंचायतीच्या या गायरान जागेत डंपिंग ग्राउंड तयार करण्याचे असून त्यासाठी या जागेत मोठा खड्डा काढायचा आहे. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत तसे ठरविण्यात आले आहे. मात्र त्याचे मोजमाप व त्याबाबतची निविदा ग्रामपंचायतीने अजून काढली नाही. त्यामुळे रविवारी जे मुरूम उत्खनन केले गेले ते पूर्णत: बेकायदेशीर आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनीही याबाबत आपणास काही कल्पना नसल्याचे सांगितले.
एका दिग्गज नेत्याने या जागेतील मुरूम उत्खनन करून तो 2000 रूपये प्रति डंपर या दराने विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. हा अवैधरित्या चाललेला गोरखधंदा सरपंच व उपसरपंच यांनादेखील माहिती नव्हता की सोयीस्कररित्या जाणीवूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात होते असा संशय ग्रामस्थांमधून बोलून दाखविला जात आहे.
उत्खनन करून विक्री केलेल्या मुरूमाची जितकी किंमत घेतली गेली; ती रक्कम व तितक्याच रकमेचा दंड ग्रामपंचायतीने वसुल करावा व अवैधरित्या शासकीय जागेत उत्खनन केलेप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
सदर गायरान जागेत डंपिंग ग्राउंड करायचे असून त्यासाठी येथे खड्डा करायचा आहे. त्यातून निघणारा मुरूम कोणाला हवा असल्यास तो मिळेल. परंतु परस्पर कोणीही मुरूम चोरून नेत असेल व विक्री करीत असेल तर ते योग्य नाही. मुरूम कधी, कोणी व कुठे नेला याबाबत मला अजिबात कल्पनाही नव्हती. याचा खुलासा झाल्यावर संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करू.
रफिक इनामदार, सरपंच, वेळे.