दिल्ली विद्यापीठाचे प्रा. हनीबाबु यांचे घराची झडती
पुणे – शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या अनुषंगाने नक्षलवादी संघटनांचा सहभाग असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करत लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते अशा नक्षल संघटनेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. मंगळवारी पुणे पोलिसांनी एल्गार केसच्या अनुषंगाने दिल्ली विद्यापीठाचे प्रा. हनीबाबु (वय 45) यांचे उत्तर प्रदेशातील नोयडा येथील घरी छापेमारी करत त्यांचे घराची झडती घेतली.
पोलिसांनी प्रा. हनीबाबु यांना अटक केली नसल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त बच्चन सिंग यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांचे घरातून पोलिसांनी हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, लॅपटॉप असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. छापेमारी करताना पोलिसांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डीग केलेले असून पंचनामा हनीबाबु यांना देण्यात आला आहे. पुणे शहरात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा याठिकाणी दाने गटात हिंसाचार उफाळून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. या प्रकरणात नक्षलवादी संघटनाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींचे अटकसत्र सुरू केले. हनीबाबु हे दिल्ली विद्यापीठात अनेक वर्षांपासून प्राध्यापक पदावर काम करत असून त्यांचे नाव संशयित अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आले आहे. दिल्ली येथून अटक करण्यात आलेला रोना विल्सन याचे संपर्कात हनीबाबु असल्याची माहिती तपास पथकास मिळालेली आहे. तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर पोलिसांचे मदतीने हनीबाबु यांचे घरावर छापा टाकून महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले.
एल्गार परिषदप्रकरणी टाकण्यात आलेल्या छाप्यात प्रा. हनीबाबु यांचे नाव समोर आले. नक्षलवाद्यांच्या संपर्कात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यांच्या घरातून हार्ड डिस्क जप्त केली असून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.
– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे