पुणे – शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 9 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तर, दुसरा भाग भरण्यासाठीचे वेळापत्रक यथावकाश जाहीर होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर 1 ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपासून महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून भरलेली माहिती प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. 9 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी लिंक खुली केली जाणार आहे. विद्यार्थी स्वत: अथवा पालकांच्या मदतीने किंवा शाळा आणि मार्गदर्शन केंद्राची मदत घेऊन अर्ज करू शकतील. प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रथम ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर लॉगीन आयडी मिळवणे व पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मिळालेल्या लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरावा. शुल्क भरून अर्ज लॉक करणे आवश्यक आहे.
भाग 2 भरण्याचे वेळापत्रक यथावकाश जाहीर होणार
अकरावी प्रवेशासाठी भाग 1 व भाग 2 असे अर्ज करावे लागतात. भाग 1 मध्ये विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती असते. त्यानुसार शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणे प्रारंभी भाग 1 भरण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यंदा सीईटीची परीक्षा, निकाल आणि दहावी निकालाचे मूळ गुणपत्रक प्राप्त झाल्यानंतरच भाग 2 भरण्याचे वेळापत्रक यथावकाश जाहीर केले जाणार आहे.
अर्जाच्या सरावासाठी मॉक डेमो
विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी कोणतेही अडचण होऊ नये, यासाठी त्याचा सराव होण्याच्या दृष्टीने प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा संकेतस्थळावर 1 ते 7 ऑगस्टपर्यंत देण्यात येत आहे. मॉक डेमोमध्ये भरलेली माहिती दि. 8 ऑगस्ट रोजी नष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी दि. 9 ऑगस्टपासून नव्याने विद्यार्थी नोंदणी, लॉगीन करून अर्ज भरावयाचा आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.