पुणे – अकरावी सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारपासून विनाअडथळा सुरू झाली. यापूर्वी तांत्रिक अडचणी लक्षात घेता संकेतस्थळ बदलण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत 4 लाख 91 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
राज्य शिक्षण मंडळाने अकरावी सीईटीसाठी 20 जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, तांत्रिक कारणास्तव 21 जुलैपासून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले. आता राज्य शिक्षण मंडळाने नव्याने संकेतस्थळ कार्यान्वित करीत https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरून पुन्हा अर्ज भरण्याची सुविधा सुरू केली.
सोमवारी अर्ज भरताना कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्यास प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क नाही. मात्र, अन्य केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना “सीईटी’साठी शुल्क भरावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांना येत्या बुधवारपासून (दि.28) शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.